अखेर आडवानी – भागवत भेटले

नवी दिल्ली दि.२० – या ना त्या कारणाने सतत पुढे ढकलली जात असलेली भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट आज दिल्लीत संघ कार्यालयात झाली असल्याचे वृत्त आहे. वास्तविक कालच ही भेट होणार होती मात्र आडवानी यांच्या प्रकृतीअस्वास्थामुळे ही भेट काल होऊ शकली नव्हती. काल म्हणजे बुधवारी भागवतांनी माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली.

गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणक प्रचार प्रमुखपदी निवड झाल्यानंतर नाराज झालेल्या आडवानी यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा मागे घ्यायला लावण्यात सरसंघचालक भागवत यांनी कळीची भूमिका निभावली होती व त्यामुळे भाजपमधील  अंतर्गत कलह ताप्तूरते का होईना पण मिटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आडवानी यांना राजीनामा मागे घ्यायला लावताना त्यांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याचे आश्वासनही भागवत यांनी दिले होते. आजच्या बैठकीत प्रामुख्याने याच विषयावर चर्चा झाल्याचे समजते.

अर्थात संघाने यापूर्वीच मोदींना दिला गेलेला व्हीव्हीआयपी दर्जा कोणत्याही परिस्थितीत काढून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.