मुंबई मास्टर्स बॅडमिटन संघाची मालकी सचिनकडे ?

पुणे दि.२० – येत्या १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सहा शहरात होत असलेल्या मिलीयन डॉलर  इंडियन बॅडमिंटन लीगसाठी फ्रँजायझीची नांवे निश्चित करण्यात आली असून सर्वात प्रथम हैद्राबादच्या पीव्हीपी ग्रुपचे नांव जाहीर केले गेले आहे. पाच अन्य फ्रॅचायझी मध्ये मुंबई मास्टर्स टीमची मालकी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने घेतली असल्याचे वरीष्ठ वर्तुळातील खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. बॅडमिंटन खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सचिन या निमित्ताने पुढे सरसावला असल्याचेही सांगितले जात आहे.

आयबीएलची व्यावसायिक भागीदार असलेल्या स्पोर्टी सोल्युशनचे सीइओ आशिष चढ्ढा यांनी याबाबत स्पष्ट पणे बोलायचे टाळले असले तरी प्रॉमिनंट क्रिकेटपटूकडे मुंबई मास्टर्स संघाची मालकी असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. पीव्हीपी शिवाय अन्य पाच टीम्सची मालकीही दिली गेली आहे मात्र कांही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच त्यासंबंधी घोषणा होईल असेही ते म्हणाले.

अन्य मालकांमध्ये पुणे टीमसाठी डाबरने, लखनौ टीमसाठी सहारा इंडियाने मालकी घेतली असल्याचेही सूत्रांकडून समजते. बंगलोर दिल्ली टीमची मालकी कार्पोरेट व रियल इस्टेटमधील व्यावसायिकांकडे गेल्याचेही वृत्त आहे. या स्पर्धेत जगातील नामवंत बॅडमिटनपटूंसोबतच भारतातील सर्वोत्कृष्ट बॅडमिटनपटूही सहभागी होणार आहेत. अंतिम सामना ३१ ऑगस्टला मुंबईत होणार आहे.

Leave a Comment