लोकसभा, विधानसभा प्रचाराची धुरा सुप्रिया सुळेंवर ?

पुणे दि.१७ – लोकसभा निवडणुक रिंगणात न उतरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निश्चय आणि जलसंपदा घोटाळे व वादग्रस्त वक्तव्ये यामुळे अडचणीत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पक्षप्रचाराची धुरा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीतील वरीष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार खुद्द शरदरावांचीच सुप्रिया ताईनंा महत्त्वाची भूमिका बजावताना पाहण्याची इच्छा आहे आणि महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळावा असाही त्यांचा प्रयत्न आहे.

सुप्रिया सुळे यांच्या पाठिराख्यांना त्यामुळे अर्थातच आनंद झाला आहे. मुख्य म्हणजे सुप्रिया सुळे यांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि त्यांच्याबाबत कोणतेही वाद नाहीत.अर्थात वडिलांप्रमाणे किवा चुलतभाऊ अजितदादांप्रमाणे त्या गर्दी खेचणार्‍या नेत्या नसतीलही पण महिलांचे संघटन बांधण्यात त्यांनी फार मोठी भूमिका पार पाडली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यातून त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहेच पण ही संघटना उभारणीसाठी खूप कष्टही घेतले आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे राज्यात राष्ट्रवादीचा पाया विस्तारण्यासही मोठी मदत मिळाली आहे.

खासदार वंदना चव्हाण यांच्यामते राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्यामुळे सुप्रिया सुळे यांना त्यांचे नेतृत्त्व गुण सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले आहे. आता राज्याच्या नेत्या म्हणून त्यांना जबाबदारी दिली जाईल कारण प्रचार सभातून उपमुख्यमंत्री अजितदादांना जलसंपदा घोटाळा आणि दुष्काळग्रस्तांसंबंधीची वादग्रस्त वकतव्ये यामुळे विरोधक टार्गेट करणार हे नक्कीच आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रचाराची धुरा गेली तर विरोधकांना पंचाईत होणार आहे.

सुप्रियाताईंनी मात्र याबाबत बोलताना शरद पवार साहेब असताना प्रचाराची धुरा त्यांच्याकडे येण्याचे कारण नाही असे सांगितले आहे. पवार साहेब फिट आहेत आणि तंदुरूस्त आहेत त्यामुळे प्रचाराची धुरा तेच सांभाळतील असेही त्या म्हणाल्या.