आयकर करदात्यांचा त्रास कमी होणार

नवी दिल्ली दि.१७ – ऑनलाईन पद्धतीने आयकर विवरण पत्रे सादर करणार्‍या देशातील कोट्यावधी करदात्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची अम्मलबजावणी याच वर्षापासून केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

दरवर्षी आयकर विवरण पत्रे भरणार्‍या कोट्यावधी करदात्यांना सरकारने ई फायलिंग बंधनकारक केले आहे. मात्र ई फायलिंग विवरण पत्र भरल्यानंतरही त्याचा पुरावा म्हणून या विवरणपत्राची प्रत करदात्यांना बंगलोर येथील केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडे पोस्टाने पाठवावी लागते. या विषयी आयकर अधिकारी म्हणाले की इ फायलिंग चा उद्देशच करदात्यांना कर सुलभतेने आणि त्रास न होता भरता यावा हा आहे. मात्र पुन्हा विवरण पत्राची कॉपी पोस्टाने पाठविणे आणि पोच मिळविणे करदात्यांसाठी वेळ खाणारे आणि त्रासदायक ठरते आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानेही ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पावले टाकली असून त्यामुळे करदात्यांना पोस्टाने पाठविण्याची प्रत पाठविण्याची गरज राहणार नाही अशी आशा आहे. म्हणजेच करदात्यांचा त्रास वाचणार आहे.