एसएमएसद्वारे काढता येणार रेल्वे तिकीट

मुंबई, दि.१३ – आता केवळ एका एसएमएसच्या साहाय्याने तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ई-तिकिटानंतर  ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन‘ने एसएमएसची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेच्या इंटरनेटद्वारे ई-टिकीटिंग आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता थेट मोबाईलवरून रेल्वेचे तिकिट आरक्षण करण्याची सुविधा एक जुलैपासून उपलब्ध होणार आहे.

मेल/एक्सप्रेसची तिकिटे मोबाइलवरून एसएमएस आणि यूएसएसडीवरून (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी डाटा) मिळणार आहेत. यासाठी मोबाइल बँकिंगचे साहाय्य घेतले जाणार आहे.

या तिकिटासाठी इंटरनेटची आवश्यकता नसून एसएमएसवरून तिकीट बुक करण्यासाठी आधी आयआरसीटीसी आणि बँकेत आपला मोबाइल नंबर नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेकडून मोबाइल मनी आयडेंटिफायर आणि सात आकडी’ ओटीपी ( वन टाइम पासवर्ड) मिळाल्यानंतर एका एसएमएसद्वारे मेल/एक्स्प्रेस क्रमांक, प्रवासाचे ठिकाण, प्रवासाची वेळ, दर्जा, प्रवाशांचे नाव नोंदवायचा आहे. त्यानंतर आयआरसीटीसीकडून ट्रान्सॅक्शन आयडी मिळेल. बँकेकडून रक्कम वळती केल्यावर तिकीट मिळेल.

ही सेवा सर्वच मोबाइल सेवापुरवठादारांकडून दिली जाणार असून दोन एसएमएससाठी तीन रुपये आणि बँकेकडून पाच हजारांपर्यंतच्या रकमेसाठी पाच रुपयांचे शुल्क आकारले जाईल. मोबाइलद्वारे तिकीट बुक केलेल्या प्रवाशाला या तिकिटाची प्रिंटआऊट काढण्याची गरज नाही. प्रवासादरम्यान एसएमएसद्वारे पाठविलेले मोबाइलवर डिस्प्ले होणारे तिकीट दाखवून प्रवासही करता येणार आहे.