त्यांनी हौस म्हणून १० लाखाचा सिंह पाळलाय

अरबस्तानातले शेख दुसर्‍या महायुद्धापूर्वी फारसे श्रीमंत नव्हते पण त्यांना पेट्रोलचा शोध लागला आणि ते फारच श्रीमंत होऊन बसले. तसाच प्रकार अफगाणिस्तानात घडत आहे. तिथले जमीनदार राजकीय स्थैर्य प्राप्त झाले की करोडोंनी पैसा कमावतात. पण अरबस्तानातल्या प्रमाणे त्यांना पेट्रोलने नाही तर अफूने श्रीमंती मिळवून दिली आहे. गेल्या दहा वर्षात अफगाणिस्तानात करोडपती अफू मालकांची संख्या वाढली आहे आणि हे नवश्रीमंत अफगाण आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन नाना प्रकारांनी करीत आहेत. काबूलच्या महंमद शफिक या बिल्डर कम अफू उत्पादकाने हौस म्हणून आपल्या घरात एक सिंह पाळला आहे. शफिक किती हौशी आहे हे त्याच्या मित्राला माहीत होते पण तो कुत्र्यांचा शौक करीत होता. त्याच्या मित्राने एके दिवशी शफिकला सिंहाचा छावा विकत घेशील का असे विचारले. शफिकला सुरूवातीला नको म्हणावेसे वाटले पण दुसर्‍याच क्षणाला त्याने होकार दिला आणि तो छावा कंदाहारहून काबुलला आणला.

या छाव्याचे नाव अजून ठेवण्यात आलेले नाही. तो सहा महिन्यांचा आहे. तो चार महिन्यांचा असताना त्याला विकत घेतले गेले आहे. त्याला आता शफिकने आपल्या राजेशाही घराच्या गच्चीवर ठेवले आहे. अर्थात या गच्चीवर शफिक आणि या छाव्याच्या सेवेसाठी नेमलेला नोकर या शिवाय कोणीही जाऊ शकत नाही. एक हजार डॉलर्स पगार देऊन एक खास नोकर नेमला आहे. तो या छाव्यासाठी ताजे मांस आणतो आणि त्याला खायला देतो. हा छावा गच्चीवर पडलेला असतो. एका कोपर्‍यात बसून असतो. त्याला त्याच्या जेवणाच्या वेळी खालच्या मजल्यावरच्या डायनिंग हॉलमध्ये आणले जाते. हा डायनिंग हॉल खास त्याच्यासाठीच तयार केलेला आहे. त्याच्यावर शफिकचा दरमहा दोन लाख डॉलर्स खर्च होतो. पण तेवढा खर्च करण्या इतपत तो हौशी आहे. कुत्री पाळताना काय करावे लागते हे त्याला माहीत आहे पण सिंह कसा पाळायचा असतो हे त्याला माहीत नाही. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी एका खास डॉक्टरांची नेमणूक केली आहे. एकदा हौस म्हणून खरेदी केलेला हा छावा आता शफिकच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे कारण घरात सिंह पाळणारा तो अफगाणिस्तानातला एकमेव हौशी मालक ठरला आहे.

Leave a Comment