टाटा नॅनो सीएनजी १९ जूनला येणार

पुणे दि.११ – जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळख मिळविलेल्या टाटाच्या नॅनोचा खप म्हणावा तसा वेग घेत नसल्याने कंपनीने नॅनो २०१३ बरोबरच सीएनजी इंजिनासह नवी नॅनो या वर्षात सादर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन सीएनजी इंजिनासह नॅनो सादर केली जात असून त्यामुळे शहरी भागात तरी नॅनोचा विक्री वाढेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. नव्या नॅनोमध्ये कांही महत्त्वाचे बदलही केले जात आहेत, नवीन बंपर डिझाईन व नवीन निळा रंग या मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहेत.

नॅनो २०१२ सादर केल्यानंतर नॅनोच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले होते आणि नॅनो २०१३ आणि सीएनजी नॅनो बरोबरच सादर होत असून त्यामुळे मागील नुकसान भरून विक्रीचे प्रमाण वाढेल असा विश्वास कंपनी अधिकार्यांयनी व्यक्त केला आहे. या दोन मॉडेलबरोबरच टाटा सुमो ही नव्या अवतारात १९ जूनला सादर केली जात आहे. यात इंटिरियल बदल करण्यात आले असून स्टिरीओ सिस्टीम, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हिटी अशी त्यांची अन्य वैशिष्ठये आहेत.

टाटा मोटर्सने त्यांच्या टाटा इंडिगो इसीएफ मध्येही कांही बदल करून ती पुन्हा सादर केली जात असल्याचे जाहीर केले आहे. ही गाडीही १९ जूनलाच सादर होत आहे. सेदान श्रेणीतील होंडा अमेझ, महिद्रची व्हेरीटो विबे यांच्याशी इंडिगोला स्पर्धा करावी लागत असल्याने नवीन व्हर्जन सादर करण्यात अधिक वेळ घालविला जाणार नसल्याचेही कंपनी अधिकार्‍यांनी सांगितले.