निवडणूक आयोगाचा निर्णय; RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तरच मिळणार मतमोजणी केंद्रात प्रवेश


नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने २ मे रोजी जाहीर होणाऱ्या मतमोजणीसंदर्भात अजून एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आता आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असणार आहे.

यासंदर्भात एक विशेष आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांमध्ये २ मे रोजी मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या अनुषंगाने काढलेल्या आदेशात निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईज करण्याचेही आदेश दिले आहेत.

त्याबरोबर मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही.

तत्पूर्वी कालच निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही. राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरले पाहिजे, असे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केले होते.