राज्य सरकारने लवकर उपलब्ध करुन द्याव्यात लस; पुण्याच्या महापौरांची विनंती


पुणे – कोरोना प्रतिबंधक लसींच्या टंचाईची ओरड देशभरात सुरु असतानाच या दरम्यान केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास परवानगी दिली आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मेपासून सुरू होणार असले, तरी ते लांबण्याचीच चिन्हे दिसत आहे.

सध्या पुणे शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयात लसीकरण कालपर्यंत (२७ एप्रिल) सुरू होते. पण महापालिकेला काल रात्रीपर्यंत लसी उपलब्ध न झाल्यामुळे आज (२८ एप्रिल) शहरातील लसीकरण झाले नाही. तसेच उद्यासाठीही अद्यापपर्यंत लस उपलब्ध झालेली नसल्यामुळे सरकारने अधिकाधिक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना पुणे महापालिका हद्दीतील लसीकरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, मागील महिनाभरात पुणे शहरात महापालिका प्रशासनामार्फत चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने रुग्ण संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याकरिता आम्हाला लागणाऱ्या ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन या दोन गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. पण ते राज्य सरकारकडून होत नसल्याचे दिसत आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, लसीकरणाला परवानगी दिल्यापासून आजअखेर पहिला आणि दुसरा डोस मिळून ७ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. कालपर्यंत प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्व ठिकाणी लसीकरण सुरू होते. पण काल रात्रीपर्यंत आजच्याकरिता लस उपलब्ध न झाल्यामुळे शहरात लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने अधिकाधिक मदत देण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसत नसल्याची खंत देखील मोहोळ यांनी व्यक्त केली.