लॉकडाऊन होणारच; पण तो किती दिवसांचा असेल त्याबाबतचा निर्णय 30 एप्रिलला घेतला जाईल !


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल संध्याकाळपासून राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तो १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार असल्यामुळे आता पुढे काय? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता खुलासा केला असून लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लॉकडाऊनच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली आहे. लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात असून त्या अनुषंगाने सध्याच्या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

३० एप्रिलपर्यंत सध्या आपण लॉकडाऊन लागू केला आहे. मंत्रिमंडळात त्यासंदर्भात देखील चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लॉकडाऊन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रिमंडळाने चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल, असा माझा अंदाज असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये लस विकतच घ्यावी लागणार असल्याचे, यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. येथून पुढे खासगी रुग्णालयांमध्ये पैसे देऊनच लस घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारच्या दवाखान्यांमध्येच फक्त लस मोफत मिळणार असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक तसेच जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या वाहनांना ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील (औषध वगळता) दुकानांना केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत लोकलच्या प्रवासावर निर्बंध आहेत.

आता मुंबई आणि ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे. पण, विदर्भ आणि मराठवाडयातील अनेक जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही. म्हणून लॉकडाऊनचा कालावधी वाढण्यावर विचार करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी नागपूरसारख्या शहरात नवीन कोविड केअर सेंटरला परवानगी दिली जात नाही. रुग्णालयात बेड्सची कमतरता आहे. अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढणार असल्याचे बोलले जात होते. अखेर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

राज्यातील लॉकडाऊनबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या होत्या. खुद्द राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीदेखील लॉकडाऊनची गरज असल्याची मते व्यक्त केली होती. कोणालाही लॉकडाऊन आवडत नसून माझाही आधीपासून विरोध आहे. पण आरोग्य सुविधा संपत आहेत. असाचा मारा सुरु राहिला, तर खूप मोठा गोंधळ होईल. लॉकडाऊन करुन साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती.