
पुणे : पुणे महानगरपालिकेने कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यातील एकूण सगळा गोंधळ पाहता पुणेकरांसाठी लसींची थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अदर पुनावालांची यासाठी भेट घेत १० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती त्यांना करणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महानगरपालिकेने घेतला पुणेकरांसाठी लसींची थेट खरेदी करण्याचा निर्णय
जवळपास १०० हून अधिक केंद्रावर पुणे महानगरपालिकेकडुन लसीकरण सुरु आहे. पण, राज्य सरकारकडून महापालिकेला येणाऱ्या लसी पुरेशा नसल्यामुळे वारंवार लसीकरणात अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर येत असल्यामुळे आता पुणे महानगरपालिका थेट लस खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साधारण १० लाख लसी मिळाव्यात, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ करणार आहेत.
महापौर मुरलीधर मोहोळ याविषयी बोलताना म्हणाले, लसींची थेट खरेदी करायला आम्ही तयार आहोत. त्यासाठी निधीची तरतूद करण्याचीही महानगरपालिकेची तयारी आहे. त्याच्या चर्चेसाठी सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांची भेट मागितली आहे. त्यांची वेळ मिळाली की याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
