रिलायन्स फाऊंडेशनने केली ८७५ बेड्सची व्यवस्था; त्यापैकी १४५ आयसीयू बेड्स


मुंबई – देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील अनेक उद्योजकांनी अशा परिस्थितीत मदतीचा हात पुढे केला आहे. आता रिलायन्स फाऊंडेशनने देखील कोरोनाच्या महामारीत आरोग्य सुविधांवर येत असलेला ताण लक्षात घेता वैद्यकीय मोहीम जलद केल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.

एनएससीआय, सेव्हेन हिल्स रुग्णालय, ट्रायडेंट आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रिलायन्स फाऊंडेशनने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जवळपास ८७५ बेड्सची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून त्यात १४५ आयसीयू बेड्सचा देखील समावेश आहे. या ठिकाणी रिलायन्स फाऊंडेशनतर्फे रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये आयसीयू बेड्स. व्हेंटिलेटर्स, आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.

एका निवेदनानुसार ६५० बेड्सची व्यवस्था एनएससीआयमधील सर एनएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात केली जाणार आहे. त्याचबरोबर येथे रिलायन्स फाऊंडेशन १०० नव्या आयसीयू बेड्सची व्यवस्था करणार आहे. ते १५ मे पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी ६५० बेड्सची व्यवस्था रिलायन्स फाऊंडेशन करणार आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ५०० डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची दिवसरात्र सेवा घेतली जाणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

एनएससीआय आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. १४५ आयसीयू बेड्ससह सुमारे ८७५ बेडचे रिलायन्स फाऊंडेशन व्यवस्थापन करेल, अशी माहिती रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी दिली आहे.

नेहमीच देशाच्या सेवेत रिलायन्स फाउंडेशन अग्रस्थानी राहिले आहे आणि महासाथीच्या विरूद्ध भारताच्या संघर्षात योगदान देणे, आपले कर्तव्य आहे. सध्या गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दमण, दीव आणि नगर हवेलीला रिलायन्स दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.