कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलबाबत बीसीसीआयचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – कोरोनाची वक्रदृष्टी आता आयपीएल स्पर्धेवर पडली असल्यामुळे परदेशी खेळाडू एक एक करुन भारत सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयपीएलचे आतापर्यंत २० सामने खेळले गेले आहेत. काही खेळाडूंना आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे खेळाडूंच्या गोटात देशातील कोरोना स्थिती पाहता चिंतेचे वातावरण आहे. पण उर्वरित सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पीटीआयला ही माहिती बीसीसीआयने दिली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेले तरी काही हरकत नसल्याचे सांगितले आहे. राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यु टाय, रायल चॅलेंजर्स बंगळुरुचे अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतलेल्या अँड्र्यु टायने कोरोना स्थितीमुळे आणखी खेळाडू स्पर्धा सोडतील, असा दावा केला आहे.

बायो बबल आयपीएल स्पर्धेसाठी तयार केला आहे. पण भारतातील कोरोना स्थिती पाहता खेळाडूमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे कोलकाता नाइटराइडर्सचा मेंटॉर डेविड हसीने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू अजूनही स्पर्धेत खेळत आहेत. या व्यतिरिक्त प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग, सायमन कॅटिच, समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लीजा स्टालेकर आहेत.