शिल्पाने लावला होता एका सामन्यात सट्टा

नवी दिल्ली: गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या चौकशीत राजस्थान रॉयल्स संघाचा मालक राज कुंद्रा याने आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याचे समोर आले आहे. त्यातच आता राज कुंद्राची पत्नी तथा अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही एका सामन्यात सट्टा लावल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकाराशी आतापर्यंत काही संबध नाही म्हण-या अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पोलीसांनी दिलेल्या माहितीमुळे बोलती बंद झाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राज कुंद्रा याची बुधवारी व गुरुवारी सुमारे बारा तास कसून चौकशी केली. कुंद्राने सट्टेबाजीची कबुली दिल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यानंतर राज कुंद्राचा पासपोर्ट जप्त करण्यात आला .राज कुंद्रा स्वत:च्याच संघावर सट्टा लावत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात कुंद्राने सुमारे एक कोटीचा सट्टा लावल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

राज कुंद्राने सट्टेबाजीचा हा आरोप फेटाळला असला तरी त्याने पोलिस चौकशीत मात्र आपण सहभागी असल्याचे कबूल केले आहे. दरम्यान या चौकशीवेळी सट्टेबाजीमध्ये शिल्पा शेट्टीचे ही नाव आले आहे. तिने ही एका सामन्यावेळी सट्टा लावल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आगामी काळात पोलिस तिला ही बोलविणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.