टीम इंडियाची विजयी सलामी

कार्डिफ: चम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला २६ धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार सलामीवीर शिखर धवन हा ठरला. त्याने ९४ चेंडूंत ११४ धावांची खेळी रचून भारताच्या डावाचा भक्कम पाया रचला. त्याच्या फलंदाजीच्या जोरावरच भारताला तीनशे धावाचा टप्पा ओलाडता आला.

गुरुवारी इंग्लंडच्या कार्डिफमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ५० षटकांत ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते. टीम इंडियाकडून शिखर धवनने ९४ चेंडूंत ११४ धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्माच्या साथीने १२७ धावांची सलामी दिली. त्यात रोहितचा वाटा ८१ चेंडूंत ६५ धावांचा होता. त्यानंतर विराट कोहलीने ३१ धावांची, कर्णधार धोनीने २७ धावांची आणि रवींद्र जाडेजाने नाबाद ४७ धावांची उपयुक्त खेळी केली.

भारताच्या भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेचा संघ ५० षटकात ३०४ धावा काढून बाद झाला. सलामीच्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

Leave a Comment