मुंबई, दि.२२ – भारतीय वंशाच्या १८ वर्षीय अमेरिकेन मुलीने मोबाईल जगतात नवा भन्नाट शोध लावला आहे. मोबाईल केवळ २० ते ३० सेकंदात पूर्णपणे चार्ज करू शकेल, अशा सुपर-कॅपॅसिटर उपकरणाचा शोध तिने लावला आहे. या भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलीचे नाव आहे इशा खरे.
ईशा खरेचा शोध – फक्त 20 सेकंदात मोबाईल चार्जिंग!
मोबाईल हा आता अत्यावश्यक सेवेत गणला जावू लागला आहे. त्यामुळे त्याची देखभाल, बॅलन्स तसेच बॅटरी यांची वरचेवर तपासणी करावी लागते. बर्याचदा कॉल जास्त वेळ झाला तर बॅटरी संपते, ती पुन्हा चार्ज करण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. या वाया जाणार्या वेळेवर उपाय म्हणून इशाने लावलेला शोध विशेष आहे.
इशा ही अमेरिकेतील इतर मराठी कुटुंबातील मुलींसारखीच एक आहे. पण तिचे कर्तृत्व हे तिला इतरांपेक्षा वेगळी ठरवत आहे. कारण इशाने ऊर्जेच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. आतापर्यंत १० ते १५ मिनिटे वेळ खाणार्या मोबाईलच्या चार्जिंगसाठी आता फक्त अर्धे मिनिट लागणार आहे. ही किमया केली आहे इशाच्या सुपर कॅपॅसिटरने. या शोधासाठी तिला यंग सायंटिस्टचा अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे.
इशाच्या या नव्या सुपर कॅपॅसिटरची दखल गुगलनेही घेतली आहे. आतापर्यंत या सुपर कॅपॅसिटरची चाचणी फक्त एलईडी दिव्यांवर झाली आहे. आगामी काळात या कॅपॅसिटरचा वापर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये करता येणार आहे. कदाचित उद्या मोबाईलमध्ये वापरली जाणारी बॅटरी तुम्हाला दिसणारही नाही.
ईशाच्या या उपकरणाचे आयुष्य १० हजार चार्ज-रिचार्ज सायकल एवढे आहे. सध्या या कपॅसिटरच्या चाचण्या सुरू आहेत. लवकरच तो मोबाईल आणि अन्य उपकरणांसाठी वापरता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
