नवी दिल्ली, दि.२२ – चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी काल येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणारी कुठलीही कृती चीन करणार नाही, अशी ग्वाही यावेळी ली यांनी दिली. भारताकडे एक महत्त्वपूर्ण मित्र म्हणून चीन पाहतो. द्विपक्षीय संबंध आणखी सुधारण्याच्या दृष्टीने मोठा वाव आहे, अशी भावना या भेटीत ली यांनी व्यक्त केल्याचे राष्ट्रपती भवनाच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारताच्या हितसंबंधांना चीनकडून बाधा नाही – ली
चीनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौर्यासाठी ली यांनी भारताची निवड केल्याबद्दल यावेळी मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केले. एकविसाव्या शतकाच्या दृष्टीने भारत आणि चीन मैत्रीला मोठे महत्त्व आहे. दोन्ही देशांदरम्यान वाहणार्या नद्या विभाजन करणार्या नव्हे तर दोहोंना जोडणार्या ठराव्यात, असे प्रतिपादन यावेळी मुखर्जींनी केले. दरम्यान, मुखर्जी यांनी ली यांना महात्मा गांधी आणि राष्ट्रपती भवनाशी संबंधित पुस्तके भेट म्हणून दिली.
