पंतप्रधान सादर करणार युपीए-२ ‘रिपोर्ट कार्ड’

नवी दिल्ली, दि. २० – भ्रष्टाचार, गैरव्यवहार, लाचखोरी आदींमुळे चहुबाजूनी जेरीस आलेल्या सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए -२ चे शेवटचे रिपोर्ट कार्ड’ २२ मे रोजी सादर केले जाणार आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे कार्ड सादर करणार असून त्यातून या सरकारच्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतणवूक आदी सकारात्मक बाबी पोचवल्या जातील. या कार्डच्या माध्यमातून युपीएची ढासळती प्रतिमा सावरुन पुढील वर्षीच्या सर्वसाधारण निवडणुकीच्या पार्श्वतभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ पुरविले जाणे अपेक्षित आहे.

युपीए-२ ला सत्तेवर येवून २२ मे रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि युपीएतील महत्वांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हे रिपोर्ट कार्ड सादर केले जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर्स’ म्हणून पाहिल्या जाणार्‍या बहुचर्चित राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयक आणि भूसंपादन विधेयकाच्या पार्श्वाभूमीवर आखण्यात आलेले नियोजनही पंतप्रधान जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.

अर्थात, पवनकुमार बन्सल आणि अश्ववनी कुमार या दोन मातब्बर मंत्र्यांची मंत्रीमंडळातून नुकतीच करण्यात आलेली हाकालपट्टी आणि एकामागून एक उघडकीस येणार्याड घोटाळयांच्या पार्श्वनभूमीवर आपल्या सरकारचे सकारात्मक चित्र तयार करणे हे पंतप्रधानांसाठी खचितच सोपे नाही. पंतप्रधान व आपल्यात मतभेद असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वतभूमीवर या भोजनाला उपस्थित राहून व पंतप्रधानांना पाठिंबा देवून सोनिया एका दगडात दोन पक्षी मारतील, असे दिसते.
तृणमुल काँग्रेस व डीएमके युपीएमधून बाहेर पडल्याने या भोजनाला त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसतील असेही समजते.