सिद्धरामय्यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळूर, दि. १४ – कर्नाटकचे २२ वे मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी काल शपथ घेतली. येथील कांतीवीर स्टेडियमवर जाहीर शपथविधीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. शपथविधी सोहोळ्याला प्रचंड गर्दी झाली होती. त्यांनी सध्या एकट्यानेच शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाची रचना अजून जाहीर झालेली नाही. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून नंतर मंत्रिमंडळ अस्त्विात येईल.

सिद्धरामय्या यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धक मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीयमंत्री वीरप्पा मोईली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री, ऑस्कर फर्नांडिस, बी. के. हरिप्रसाद आदी नेते यावेळी उपस्थित होते. दरवेळी विधान सौधच्या इमारतीत अथवा राजभवनावर शपथविधी होतो; परंतु यावेळी प्रथमच जाहीरपणे एका स्टेडियमवर हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने २२३ पैकी १२१ जागा जिंकून स्वबळावर येथे आपले सरकार आणले आहे. नवनिर्वाचित आमदारांकडून गुप्त मतदान पद्धतीने राज्याचा मुख्यमंत्री निवडण्याचे काम काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने केले.

शपथविधीच्यावेळी समर्थकाचा मृत्यू
मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचा आज शपथविधी झाला त्यावेळी त्यांचे असंख्य समर्थक येथे उपस्थित होते त्यापैकी मंजाप्पा नावाच्या त्यांच्या एका समर्थकाचा या समारंभानंतर स्टेडियममध्येच मृत्यू झाला. समारंभानंतर गेट नंबर ७मधून बाहेर येत असताना तो अचानक कोसळला. त्याला पाणी देऊन लगेच रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्याचे निधन झाले..