दोन तासात मराठीतून संगणक शिक्षणाची ज्ञानमहामंडळाची योजना

पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) – मराठीत दोन तासांत संगणक शिक्षण देणारी आणि संगणकांच्या माध्यमातून मराठी लिहिता, वाचता येणारी अशा स्वतंत्र दोन मराठी ई-लर्निंग अभ्यासक्रम प्रणाली महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे विकसित करण्यात येत आहे. यातील दोन तासात मराठी संगणक शिक्षण देणारी प्रणाली 10 मे 2013 पर्यंत खुली होईल. ’’, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकी संचालक विवेक सावंत यांनी दिली.

भाषा सल्लागार समितीतर्फे पुढील 25 वर्षांकरिता भाषा विषयक धोरणासंदर्भात आयोजित सहविचार बैठकीत सावंत यांनी हि माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे दोन तासांत मराठीत संगणक शिक्षण देणारे सुलभ मराठीई-लर्निंग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत माहिती तंत्रज्ञान आपल्या मातृभाषेत अवगत होण्यासाठीचे 10 मुद्दे दिले आहेत. येत्या काही दिवसात ही प्रणाली वापरात येईल. यासाठी भाषा तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. ही प्रणाली सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर वापरात येईल. एमकेसीएलतर्फे एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण देणारी राज्यात सुमारे 5 हजार केंद्र आहेत. या केंद्रातून जवळपास पाच लाख विद्यार्थी प्रशिक्षिण घेत आहेत. या मुलांद्वारे हा ई-लर्निंगचा अभ्यासक्रम प्रमाणित करण्यात येईल. त्यानंतर यांची सुधारित आवृत्ती सादर करण्यात येईल.’ त्याचप्रमाणे इंग्रजी वा्नयांचे मराठी भाषांतर यासारख्या प्रणाली उपलब्ध होणार आहे. तसेच संगणकाच्या माध्यमातून मराठी भाषा लिहिता आणि वाचता यावी, असे शिक्षण देणारे ई-लर्निंगची नवी प्रणालीही एमकेसीएलतर्फे लवकरच निर्मित करण्यात येणार आहे. मराठी शिकण्याची ही प्रणाली मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, असेही सावंत यांनी सांगितले.