रोजगार हमी आता दुष्काळी छावण्यांना लागू

पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) – चारा छावण्यांमधील दुष्काळग्रस्तांना रोजगार हमी योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात झाल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ. कदम यांनी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत नुकताच दुष्काळी भागाचा दौरा केला. 23 दिवसात बुलढाणा ते सांगली या टापूतील 9 जिल्हे आणि 200 गावांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्रीमंडळासमोर त्यांनी विविध अहवाल सादर केले होते. डॉ. कदम म्हणाले, भीषण दुष्काळामुळे लोकांना जनावरांसाठी चारा छावण्यांमध्ये जावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तसेच अनेकांच्या मुलांचे शिक्षण ही थांबले होते. लोकांना रोजगार हमी योजनेचा लाभ ही मिळत नव्हता, या समस्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तात्काळ निर्णय घेत लोकांना रोजगार देण्याची व्यवस्था केली. पूर्वी 137 रूपये मिळत असत, आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून 165 रूपये देण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रत्येकाला दुष्काळ हा स्थानिक पातळीवरचा वाटतो. मराठवाड्याचा आणि विदर्भातील दुष्काळ हा महाराष्ट्राला आपला वाटायला हवा, हा संदेश जाण्यासाठी हा दौरा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळामुळे निर्माण झालेले अनेक सामाजिक प्रश्‍न या दौर्‍याच्या निमित्ताने आपल्याला समजू शकले. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही गंभीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. युवक काँग्रेसतर्फे ‘राईट टू वॉटर‘ ही मोहिम सुरू करण्यात येणार असून प्रत्येक गावात जागृती करण्यात येईल. पाण्याच्या प्रश्‍नावर कायम स्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगीतले.

Leave a Comment