केदार शिंदे हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक यशस्वी, आघाडीचे आणि
प्रथितयश नाव आहे. `खोखो’ हा त्यांचा नवा मराठी चित्रपट लवकरच येतोय.
`शोभना देसाई प्रॉडक्शन्स प्रा.लि.’ या हिंदीतील मातब्बर संस्थेचे या
निमित्ताने मराठी चित्रसृष्टीत पदार्पण होत आहे. हा `खो’ कोण कोणाला
देतोय हे प्रत्यक्ष चित्रपट पाहताना कळेलच, पण या चित्रपटाच्या
निमित्तानं एका प्रमोशनल साँगचा विचार केदारनं केला आणि चित्रपटाचे
संगीतकार शशांक पोवार असूनही वेगळ्या जॉनरमधले हे प्रमोशनल साँग असावे या
हेतूने केदारने वैशाली सामंत हिच्यावर या गाण्याच्या संगीताची जबाबदारी
सोपवली.
केदार शिंदेच्या `खोखो’साठी उषा उत्थुप, वैशाली सामंत एकत्र
एक गायिका म्हणून तर ती प्रस्थापित आहेच पण त्याचबरोबर संगीतकार
म्हणूनही तिची आज वेगळी ओळख होऊ लागली आहे. एक प्रतिभावंत महिला संगीतकार
म्हणून तिची वेगळी ओळख असल्यानेच केदारने `खोखो’च्याप्रमोशनल साँगला
संगीत देण्याची जबाबदारी वैशाली सामंतवर सोपवली. याविषयी खुद्द वैशाली
सामंत यांनाच विचारले असता ती म्हणाली की केदार सोबत बरीचवर्ष एक गायिका
म्हणून मी निगडीत आहे. त्यामुळे केदारचे संगीतातले आकलन काय आणि किती आहे
याची मला चांगलीच कल्पना आहे. नेमके सांगायचे तर तो संगीतावर प्रेम
करणारा आहे. त्यामुळेच त्याच्या सगळ्या चित्रपटांमधली सगळीच गाणी चांगली,
वेगळी आणि लोकप्रिय आहेत. असा चित्रपट दिग्दर्शकच संगीतकाराला चांगला वाव
देऊ शकतो.
आता `खोखो’ या चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर केदारने चित्रपटाचे
शूटिंग संपण्याच्या जवळ, जवळ एक महिना आधी मला बोलावून सांगितले की या
चित्रपटासाठी आपल्याला एक प्रमोशनल साँग करायचे आहे. केदार जेव्हा अशा
प्रकारचे वेगळे काम घेऊन येतो तेव्हा आजवर बरीच कामे एकत्र केल्याने
त्याला काय हवे आहे याचा अंदाज मला आहे. प्रमोशनल साँग म्हणजे जरा हटके
असायला हवे. त्यात काहीतरी स्पेशल पाहिजे तरच ते प्रमोशनल साँग म्हणून
वाजू शकेल. कारण ते फिल्ममध्ये असलेले गाणे नाहीये, प्रमोशनल साँगला
त्याचा युएसपी असायला हवा. त्याचं वैशिष्ट्य आणि आकर्षण त्याचे काहीतरी
वेगळेपण असलेले जाणवायला हवे हे तर स्पष्टच होते.
चित्रपटाची कथा ऐकल्यावर `खोखो’ म्हणजे `लाईफ इज खोखो’ ही ओळ
माझ्यासाठी पुरेशी स्पष्ट झालेली होती. हे गाणे कोण गाऊ शकेल असा विचारही
मनात सुरु झाला. बऱयाच गायकांचे आवाजही कानात घुमत होते पण संगीतकाराला
गाणे कंपोज करण्यासाठी एक चालना मिळावी लागते. माझ्यासाठी आवाज हा
महत्त्वाचा आणि विचारांना चालना देणारा असल्याने गाणे कंपोज करण्यासाठी
आवाजात काहीतरी वेगळेपण हवे होते. खरे तर गाण्याचा मुखडाही मी तयार केला
होता, असे सांगून ती पुढे म्हणाली की, `खोखो’ म्हणजे प्रत्यक्ष जरी खेळ
नसला तरी `लाईफ इज खोखो’ म्हणजे त्यात एक एनर्जी आली. ती धावपळ आली,
स्पीड आला. त्यामुळे व्हॉईसही तसाच भारदस्त आणि स्टाईलाईज असायला हवा
होता. खरे सांगायचे तर हे गाणे सुरुवातीला मेल व्हॉईस मध्ये करूया का असा
विचार येत होता, पण यावर ठाम समाधान होत नव्हतं. त्याच सुमाराला एका
कार्यक्रमात उषा उत्थुप यांना गाताना ऐकले आणि त्यांना जाऊन भेटले.
त्यांची गाणी तर लहानपणापासूनच आपल्या कानावर येत होती. पण, प्रत्यक्ष
गाताना ज्यावेळी ऐकले आणि पाहिले त्याचवेळी माझ्या लक्षात आले की मला हवा
असलेला नेमका आवाज सापडलाय…
मला वेगळ्या जॉनरचा स्टाईलाईज आवाज हवा होता आणि उषा उत्थुप यांचा
आवाज आजच्या काळाच्या संगीतातला आणि आपल्या भारतातला, आंतरराष्ट्रीय
स्तरावरचा आणि त्याच दर्जाचा आहे. ज्या तऱहेने त्या गातात, ज्या तऱहेने
त्यांनी त्यांच्या स्वत:च्या शैलीची ओळख निर्माण केली आहे, ती अप्रतिम
आहे. माझ्या या गाण्यात त्यांचा हा आवाज खूप छान पध्दतीने नक्कीच वापरता
येऊ शकेल असेही वाटले. जेव्हा मी त्यांना भेटून त्याबद्दल विचारले,
तेव्हा त्यांना खूप वेगळं वाटलं, की एक मुलगी मला येऊन विचारतेय. पण
त्यांनी खूप छान पध्दतीने मला प्रतिसाद दिला. त्यांना बऱयाच गोष्टींचे
कुतूहल आहे. त्या खुप एन्थुझिऍस्टिक आहेत. त्यांनी कोणतेही आढेवेढे न
घेता मला मराठीत गाणं गायला आवडेल असे सांगून गाण्याचे ट्रक्स आणि लिखित
गाणे पाठवून दे असे सांगीतले. पुढे बोलता बोलता त्या म्हणाल्या की मी
यानिमित्ताने प्रथमच एका स्त्राr संगीतकाराकडे गाणार आहे.
माझ्यासाठी खरच हा दुग्धशर्परा योग म्हणता येईल. त्यांच्यासोबत काम करण्याची अंतरिक
इच्छा आणि ती पूर्ण होण्यासाठी मिळालेली संधी ही गोष्टच माझ्यासाठी खूप
महत्वाची आणि आंनदी करणारी होती. त्यांच्या होकाराने एकतर गाणे अधिक
क्लिअर झाले. उषा उत्थुप यांचा आवाज डोळ्यासमोर ठेवून त्या गाण्यावर परत
काम केले. त्यांच्या आवाजातला जोश, ऊर्जा, त्यांच्या शब्दफेकीची गती
किंवा ती त्यांची एक झकास शैली आहे. त्यांचं गाणं खास शैलीदार असतं.
त्यामुळेच त्यांच्या शैलीला साजेसे गाणे मला बनवायचे होते. त्यांचा आवाज
तर त्यासाठीच वापरायचा होता पण तो चांगल्या पध्दतीने. जेव्हा गाणे तयार
झाले तेव्हा मी त्यांना ते ऐकवले. महत्वाचे म्हणजे त्यांना ते खूप आवडले
