पुणे, दि. 5 (प्रतिनिधी) – गायीच्या दूध खरेदीत 3 रुपये तर म्हशीच्या दूध खरेदीत 5 रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 11 मे पासून होणार असून त्याचा मटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.
दूधदरात विक्रमी वाढीची शक्यता: गायीचे तीनने तर म्हशीचे पाचने
पुणे जिल्हा दूध संघात समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. या पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, कृती समितीचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, नेताजी पाटील, डॉ. विवेक क्षिरसागर आदी उपस्थित होते.
कृती समितीचे अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीतीमुळे पाणी व चारा यांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी गायीच्या दूध दरात प्रति लिटर 3 रुपये व म्हशीच्या दूध खरेदी दरात 5 रुपये प्रति लिटर वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ कृती समितीने केली होती. ह्या मागणीला खासगी आणि सहकारी दूध संस्थांनी मान्यता दिली आहे. ही दूध खरेदी दरवाढ 11 मे पासून लागू होणार आहे.
यावेळी विनायक पाटील म्हणाले की, दुष्काळामुळे पशुखाद्यांच्या दरात 16 ते 20 टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकर्यांना जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. वाहतूक व प्रक्रिया खर्चात वाढ झाल्याने दूधाचा व्यवसाय अडचणीत आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती सुधारल्यानंतर फ्लश सिझन मध्ये दुधाचे दर कमी करणे बाबत निर्णय घेता येईल. तसेच दूध खरेदी दरात एकवा्नयता आणण्यासाठी 10 मे रोजी शासनाबरोबर चर्चा करून दूध खरेदी व विक्रीचे दरवाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही कृती समितीने केली आहे.
