पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमोर आता एक नवा पेच निर्माण झाला आहे. रेल्वे मंत्री पवन बन्सल यांनी त्यांच्या भाच्याला 90 लाखाची लाच घेताना पकडण्यात आल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. साधारणत: असे होत नाही. कारण आपल्या देशातले मंत्री एवढे निलट झाले आहेत की त्यांनी नैतिक जबाबदारी नावाचा काही प्रकार शिल्लक ठेवलेला नाही. तरीही पवन बन्सल यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा देण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या आठवड्यात कायदा मंत्री यांचा राजीनामा असाच मागण्यात आला होता. त्यांचा तर गुन्हा सिद्धच होता. पण पंतप्रधानांनी त्यांना आणि पवन बन्सल यांनाही राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. कारण आपल्या मंत्रिमंडळातले एकेक सहकारी असे नैतिक मुद्यावर राजीनामे द्यायला लागले तर लोक असा प्रश्न विचारायला लागतील की, जर दोन मंत्री असे राजीनामे देतात तर मग पंतप्रधान कोळसा प्रकरणात राजीनामा का देत नाहीत ? अशा स्थितीत पंतप्रधान अडचणीत येतील म्हणून त्यांनी तर बन्सल यांना राजीनामा न देण्यास सांगितले आहेच पण काही कारण नसताना सारे काँग‘ेसचे नेतेही मोठ्या उत्स्फूर्तपणाने बन्सल यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असे एकमुखाने म्हणायला लागले आहेत. कारण त्या सर्वांसमोर हाच पेच आहे. या दोघांनी राजीनामे दिले तर पंतप्रधान पदाला चिटकून बसले आहेत असे दिसायला लागेल. ते त्यांना नको आहे. बन्सल यांच्या भाच्याला दिलेल्या लाचेचे प्रकरण कालपासून छान रंगायला मात्र लागले आहे. काल 90 लाख रुपये घेताना पकडण्यात आले होते आणि हे रिश्वत पॅकेज 2 कोटी रुपयांचे आहे असे म्हटले जात होते पण आता वेगळीच माहिती समोर आली आहे.
बन्सल राजीनामा द्या
आता समजलेल्या नव्या माहितीनुसार हे पॅकेज 10 कोटी रुपयांचे होते आणि त्यातले दोन कोटी रुपये यथायोग्य स्थळी पोचले आहेत. आता 10 कोटीची रक्कम देण्याचा वायदा होतो. त्यातले दोन कोटी रुपये मंत्र्यांच्या निकटवर्तियांना मिळतात. त्यातून केले जाण्याची अपेक्षा असलेले काम मंत्रीच करू शकतात असे असते याचा अर्थ काय घ्यायचा ? नेहमीप्रमाणे मंत्र्यांनी तो मी नव्हेच ची भूमिका घेतली आहे. हा माणूस आपला भाचा असला तरीही त्याच्याशी आपला काही संबंध नाही असा विश्वामित्री पवित्रा मंत्र्यांनी घेतली असली तरीही वास्तवात त्याचे आणि मंत्र्यांच्या मुलाचे काही व्यवसायात भागीदारी संबंध असल्याचे दिसायला लागले आहे. म्हणजे मंत्री काही तरी लपवालपवी करीत आहेत. या लाचेशी आपला काही संबंध नसेल तर त्यांनी तसे सांगावे पण तसे सांगताना त्याच्याशी आपले कसलेच संबंध नाहीत असे खोटे का सांगावे हे कळत नाही.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पैशातून केले जाणे अपेक्षित असलेेले काम मंत्र्यांच्या अखत्यारीतले आहे. त्यातून संशय बळावत आहे. मंत्र्याच्या भाच्याने अन्य कोणत्या कामासाठी पैसे घेतले असते आणि मंत्र्यांनी त्याच्याशी काही संबंध नाहीत असा पवित्रा घेतला असता तर तो पटण्यासारखा होता पण, ही लाच रेल्वेतल्या कामासाठी होती. याउपरही मंत्र्यांना जिम्मेदारी झटकायचीच असेल तर एवढी मोठी संशयास्पद रक्कम शेवटी कोणापर्यंत पोचणार होती आणि तिचा अंतिम हेतू काय होता याचा खुलासा झाला पाहिजे आणि तो होईपर्यंत मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण ते या काळात या पदावर राहणार असतील तर त्यांचा या चौकशीवर दबाव येण्याची शक्यता आहे.
आता चौकशीच्या काळात मंत्र्यांनी पदावर राहू नये ही गोष्टच विसरली जात आहे. मंत्री पदावर असतानाच त्यांची चौकशी होत आहे. त्या चौकशीचे अहवाल त्यांनाच दाखवून न्यायालयाला सादर केले जायला लागले आहेत आणि ते मंत्री आपल्या विरोधातले अहवाल आपल्याला सोयिस्कर अशा रितीने तयार करून घेत आहेत. याला काय चौकशी म्हणावे का ? चौकशी काय अशी चोेरांना विचारून असते का ? सर्वोच्च न्यायालयानेही असा सवाल कोळसा खाण भ‘ष्टाचार प्रकरणात विचारला आहे. असे असतानाही बन्सल आता पदावर बसून, कोणत्याही प्रकारच्या चौकशीस सामोरा जायला तयार असल्याचे म्हणत आहेत पण, त्यांच्या या म्हणण्यात काही अर्थ नाही कारण या संपुआघाडी सरकारने कोणत्याच चौकशीचे पावित्र्य टिकवलेले नाही मग तो कोळसा घोटाळा असो की 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणातला चाको यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त सांसदीय समितीच्या चौकशीचे नाटक असो. प्रत्येक ठिकाणची चौकशी ही तकलादू ठरायला लागली आहेे. या सरकारच्या मंत्र्यांनी चौकशी करणार्या यंत्रणा आपल्या बटिक बनवल्या असून त्यांच्या मार्फत चौकशी करण्याचा तमाशा चालवला आहे. सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीची खाबुगिरी संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. एखादे प्रकरण संपतेय ना संपतेय तोपर्यंत दुसरे प्रकरण उद्भवते. आता या प्रकरणात रेल्वे बोर्डाच्या एका सदस्याला मलईदार विभागात बदली हवी होती. त्यातून आता आठ जणांना अटक करण्यात आली आहे. निव्वळ बदली साठी काही कोटीत लाच दिली जाते ही गोष्टही धक्कादायक ठरली आहे. अन्य भ‘ष्टाचारातली कोटीची कोटी उड्डाणे ही गोेष्ट आता जुनी झाली आहे पण केवळ बदलीसाठी कोटींची लाच मोठीच धक्कादायक आहे.
