पुणे,दि.5: गेले दीडशे वर्षे समाज बांधणीच्या कामात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद,महात्मा गांधी केलेले काम आज अधिक तयारीने पुढे नेण्याची गरज आहे, असे रा स्व.संघाचे सरकार्यवाह श्री भय्याजी जोशी यांनी आज पुण्यात प्रखर हिंदुत्ववादी विचाराचे लेखक श्री ब ना जोग यांना डॉ अरविंद गोडबोले स्मृतीलेखन पुरस्कार प्रदान सोहोळ्यात बोलताना सांगितले. श्री जोग यांना स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या हस्ते हा एकविस हजार रुपये व सन्मान प्रदान करण्यात आला.
श्री भय्याजी जोशी म्हणाले, श्री जोग यांनी हिंदुत्वाचा विषय अतिशय प्रतिकूल काळात अतिशय प्रभावीपणे मांडला त्यामुळे आज अनेक गोष्टी समाजाला समजल्या आहेत. पाकिस्तान, जेहादी आक्रमण, चीनची घुसखोरी, ख्रिश्चनांच्या आक्रमक कारवाया या विषयावर त्यांनी केलेले व्यासंगी लेखन आज सामान्य माणसालाही विचार करायला प्रवृत्त करते.
समाज बांधणीच्या कामाला अधिक गती देण्याची गरज- रा.स्व.संघाच्या सरकार्यवाहांची भूमिका
स्वामी गोविंदगिरीची महाराज आपल्या भाषणात म्हणाले, भारतावर आजही जेहादी आक्रमणाचा धोका आहे. गेल्या बाराशे वर्षात जे येथे जेहादी आक्रमण झाले त्यातील पाशवी अत्याचाराची परंपरा आजही सुरु आहे का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या आक्रमणाची जर आपण बारकाईने पाहणी केली तर आजचा धोकाही अधिक स्पष्ट होईल.
डॉ अरविंद गोडबोले स्मृतिलेखन पुरस्काराविषयी बोलताना तो पुरस्कार सुरु करणारे डॉ श्रीरंग गोडबोले म्हणाले, डॉ अरविंद यांनी पन्नास वर्षापूर्वी ख्रिश्चन आक्रमण, चीन आक्रमण आणि जेहादी प्रश्न यावर विस्तृत लेखन केले. त्याच पद्धतीने लेखनाची धारदार परंपरा निर्माण केलेले श्री ब ना जोग यांनी मोठ्या प्रमाणावर लेखन तर केलेच पण सारे आयुष्य संघाला दिले. श्री जोग यांचे वैशिष्ठ्य असे की, श्री गोळवळकर गुरुजी, स्वा सावरकर आणि दीनदयाळ उपाध्याय या सर्वांची मर्जी त्यांनी संपादन केली होती.
श्री ब ना जोग आपल्या भाषणात म्हणाले, गेल्या शंभर वर्षातील समाजधुरिणामुळे जरी समाजातील दुही कमी झाली असली तरी ती पूर्णपणे गेलेली नाही. पन्नास वर्षापूर्वी संघकार्यातून आम्ही समाजातील जातीजातींचे दोष कमी करू शकलो पण ढोर आणि चांभार अशा उपजातीतील भेद मात्र आम्ही कमी करू शकलो नाही त्यासाठी अजूनही बरेच काम करावे लागणार आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळाच्या तुलनेत अनेक बाबी समाजास कळू लागल्या आहेत पण तरीही आक्रमकांचे पवित्रे पाहता अजून काम करावे लागेल.
प्रारंभी भारतीय विचार साधनेचे श्री किशोरजी शशितल यांनी प्रास्ताविक केले.
चौकट
स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचा परिचय प्रथम प्रास्ताविकात करून देण्यात आला. त्यावेळी सरकार्यवाह श्री भय्याजी जोशी यांनी त्या प्रस्तावनेस काही पुस्ती जोडली. ते म्हणाले, आपले स्वामी गोविंदगिरीची महाराज यांच्या परिचयाबाबत एक महत्वाची बातमी मी आपणाला देवू इच्छितो. ती म्हणजे महामंडलेश्वर श्री सत्यमित्रानंद यांच्या पिठावर स्वामी गोविंदगिरी महाराज यांची नियुक्ती झाली आहे. पुढील आठवड्यात हरिद्वार येथे पदारोहण समारंभ होणार आहे.
