स्टीफन हॉकिंग्जना अंतराळ प्रवासाचे वेध

लंडन दि.२ – जगप्रसिद्ध फिजिसिस्ट आणि संशोधक स्टीफन हॉकिंग्ज यांनी पुढील वर्षात म्हणजे २०१४ सालात ब्रिटीश टायकून रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या समवेत त्यांच्याच व्हर्जिन गॅलॅक्टीक या यानातून अंतराळात सफर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंब्रिजमध्ये प्रोफेसर असलेले आणि अनेक नामवंत पुस्तकांचे लेखक स्टीफन हे गेली कित्येक वर्षे पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहेत मात्र त्यामुळे आपले मनोधैर्य अजिबात खालावलेले नाही असे त्यांनी नुकतेच एका सभेत सांगितले.

स्टीफन यांचे सार्वजनिक सभातील दर्शन अगदीच दुर्मिळ आहे कारण ते बहुविकलांग आहेत आणि १ शब्द बोलायला त्यांना १ मिनिट लागते. मात्र आपण नुकताच ब्रुसेल्स, जिनिव्हा, कॅनडा, दोन वेळा कॅलिफोर्निया असा प्रवास केला आहे आणि आता आपल्याला अंतराळात झेप घ्यायची आहे तीही पुढच्या वर्षातच असे त्यांनी सांगितले. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये त्यांनी झिरो फ्लाईट ग्रॅव्हीटीचा अनुभव घेतला आहे मात्र त्यांना आता खराखुरा अंतराळ प्रवास करायचा आहे.

रिचर्ड ब्रॅन्सन यांनी स्टीफन यांचे स्वागतच केले असून त्यांना अंतराळ प्रवासास नेण्याचे वचन दिले आहे. हे प्रत्यक्षात घडले तर अंतराळवीर आणि सिनेटर जॉन ग्लेन यांच्यानंतर अंतराळात झेपावणारे स्टिफन हे दुसरे ज्येष्ठ अंतराळवीर ठरतील. ग्लेन यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी डिस्कव्हरीमधून अंतराळात झेप घेतली होती. ते आता ९१ वर्षांचे आहेत. तर स्टीफन हे ७१ वर्षोंच आहेत.

स्टीफन त्यांच्या शारिरीक व्याधींमुळे स्पष्टपणे बोलू शकत नाहीत तसेच शरीराच्या हालचालीही करू शकत नाहीत. ते व्हीलचेअरवरच आहेत आणि आता तर व्हेंटीलेटरशिवाय त्यांना जगता येत नाही. इंटेलने स्टीफन यांच्यासाठी विशेष उपकरण बनविण्याचे काम हाती घेतले असून त्यामुळे त्यांना वाक्ये चटकन कंपोज करता येणार आहेत असेही समजते.