द्वारका – पवित्र तीर्थक्षेत्र

dwarka>

द्वार म्हणजे दरवाजा. त्यावरूनच या शहराचे नांव द्वारका पडले. येथे दोन द्वारे असून एक आहे स्वर्गद्वार आणि दुसरे मोक्षद्वार. स्वर्गद्वारातून प्रवेश करायचा आणि मोक्षद्वारातून बाहेर पडायचे. हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र असलेले हे ठिकाण वैष्णवांच्या चार धामापैकी एक समजले जाते. आद्य शंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यातही द्वारकेचा समावेश असून अन्य पीठात श्रृंगेरी, जगन्नाथ पुरी, ज्योतिर्मठ अथवा जोशी मठ यांचा समावेश आहे. चार धामांतील अन्य धामे म्हणजे बद्रीनारायण, पुरी, रामेश्वर ही आहेत.
Dwarka
द्वारकेचा राजा कृष्ण म्हणून कृ ष्णाला येथे द्वारकाधीश म्हटले जाते. द्वारका कृष्णासाठीच विश्वकर्म्याने वसविली असा समज आहे. या शहराचे उल्लेख महाभारत, हरिवंश, भागवत पुराण, स्कंद पुराण, विष्णुपुराणातही आहेत. संपन्न अश्या सौराष्ट्रातील हे शहर गोमती नदीकाठी असून त्याला द्वारमती, द्वारवती, कुशस्थली अशीही नावे आहेत.
Dwarka1
गावात पाहायचे ते पहिले द्वारकाधीशाचे मंदिर. सहाव्या सातव्या शतकातले हे मंदिर असून मूळ मंदिर कृष्णाचा पणतू राजा वज्राने बांधले होते असा इतिहास आहे. पाच मजल्यांचे हे मंदिर चुनखडी आणि दगडात बांधले असून मंदिरावर असलेला ध्वज दिवसातून पाचवेळा बदलला जातो. येथेच स्वर्गद्वार आणि मोक्षद्वार आहे. गोमती जेथे सागराला मिळते तेथेच हे मंदिर असून द्वारकाधीशाची अप्रतिम सुंदर आणि दागदागिन्यांनी मढलेली मूर्ती भाविकांच्या नजरेचे पारणे फेडते. याच परिसरात कृष्णाचा पिता वसुदेव, देवकी, बलराम, रेवती, सुभद्रा, रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती यांचीही मंदिरे आहेत.
Dwarka3
द्वारकेतील सुंदर रस्ते, महाल , सुदामा सभा या आणखी काही पाहण्यालायक वास्तू. येथे कृष्णाच्या राण्यांचे सात हजार महाल होते असेही सांगितले जाते. त्यातील कांही आजही पाहायला मिळतात. सुंदर बगिच्यांनी या शहराला अधिक देखणे बनविले आहे.
Dwarka2
कृष्णाची खरी द्वारका ही नव्हे. कारण ती समुद्रात तीन वेळा बुडाली होती. या द्वारकेपासून जवळच बेट द्वारका आहे. तेथे बोटीतून जावे लागते. मूळ द्वारका बुडाल्यानंतर येथे कृष्णाने यादवांसह नवी राजधानी वसविली असे सांगितले जाते. येथेही द्वारकाधीशाचे मंदिर असून या मंदिरातील मूर्ती द्वारकाधीश मंदिरातील मूर्तीसारखीच आहे. येथे देवी रूक्मिणीचे विशेष मंदिर आहे.. कृष्ण मंदिराला येथे जगद मंदिर असे संबोधले जाते. त्याचबरोबर लक्ष्मीनारायण, त्रिविक्रम, जांबवती यांचीही मंदिरे येथे आहेत. येथून जवळच बारा ज्योतिर्लिगातील नागेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
Dwarka4
महाभारताच्या युद्धानंतर कृष्ण वैकुंठाला गेला त्यानंतर ३६ वर्षांनी अर्जुन द्वारकेला गेला आणि कृष्णाच्या नातवाला हस्तिनापुरात घेऊन आला. अर्जुन आणि कृष्णाचा नातू वज्र द्वारकेतून बाहर पडल्यानंतर ती द्वारकाही बुडाली. विशेष म्हणजे या गावापासून दूर समुद्रात मूळ द्वारकेचे अवशेष पुराणवस्तू संशोधकांना सापडले असून तेथे आजही समुद्रात बुडालेली तटबंदी दिसते तसेच भांडी दागिने अशा अनेक वस्तूही सापडल्या आहेत. मात्र या ठिकाणी जाता येत नाही. द्वारकेत निवासासाठी अनेक चांगली ठिकाणे असून खाण्यापिण्यासाठीच्या सोयीही चांगल्या आहेत. खास गुजराथी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. जाण्यायेण्यासाठी रस्ते वाहतूक अतिशय सोयीची आहे. रेल्वेची थेट सेवा आहे.

Leave a Comment