मुंबई दि.३० – भांडूप येथे ज्येष्ठ महिलेच्या फ्लॅटमध्ये झालेल्या चोरी आंणि खून प्रकरणात माग घेण्यासाठी आणलेल्या श्वान पथकातील तल्लक श्वानाने पहार्यावरच्या पोलिसाकडेच आपला मोर्चा वळवून त्याच्यावर झेप घेतल्याने एकच गोंधळ उडाला आणि पहार्यावरचा पोलिस क्षणात संशयित ठरल्याची घटना मंगळवारी घडली.
यासंबंधीची हकीकत अशी की भांडूप येथे गुरूवारी एका ज्येष्ठ महिलेच्या घरी चोरी करून तिचा खून केल्याची घटना घडली. त्याची माहिती मिळताच या विभागातील हवालदाराला त्वरीत घटनास्थळी जाण्याचे आदेश वरीष्ठांनी दिले. त्यावेळी हा हवालदार ड्यूटीवर नव्हता. बहुदा ड्यूटीवर नसलेला पोलिस असे आदेश आले तर युनिफॉर्मवर साधे शर्ट घालून जातात तसाच हाही गेला. मात्र तेथे गेल्यावर घटनास्थळी वरीष्ठ अधिकारी येणार असल्याचे समजल्यावर त्याने तातडीने वरचा साधा शर्ट काढून प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवला आणि ती पिशवी त्या घरातच ठेवली.
दरम्यान वरीष्ठ पोलिस आले. खून झालेल्या माहिलेच्या घरात वॉश बेसिनजवळ दोन ग्लोव्हज आणि एक संशयास्पद पिशवी दिसताच श्वानपथकाला बोलावणे गेले. श्वान पथक आले तेव्हा हा हवालदार खाली येऊन जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवत होता. कुत्र्याला पिशवीतील शर्टचा वास देण्यात आला तेव्हा हे हुषार श्वान वेगाने खाली धावले आणि एका क्षणात त्याने या पोलिसावरच झेप घेतली. हे पाहाताच त्या पोलिसासह उपस्थित पोलिस अधिकारीही थक्क झाले. तोपर्यंत शर्टचे लेबल पाहून एक पथक डोंबिवलीला टेलरच्या पत्त्यावर रवाना झाले होते.
मात्र एकंदर प्रकार लक्षात येताच संबंधित हवालदाराने काय घडले त्याची माहिती वरीष्ठांना दिली. मग टेलरकडे तपासाला गेलेले पथक परत बोलविले गेले आणि खर्या खुन्याचा माग न काढताच पोलिस माघारी फिरले.