हैद्राबाद दि.३० – कर्नाटकातील निवडणूक प्रचाराची सभा घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांना दिल्लीहून बंगलोरकडे नेणारे विमान अचानक बिघडल्याने हैद्राबादच्या बेगमपेट विमानतळावर तातडीने उतरविण्यात आल्याचे समजते. विमानातील दोष वेळीच लक्षात आल्याने वैमानिकाने विमान उतरविले. हैद्राबाद विमानतळावर यामुळे आडवानी यांना सुमारे दोन तास अडकून पडावे लागले. कर्नाटाकात विधानसभेच्या निवडणुकांसाठी ५ मे रोजी मतदान होत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना हे वृत्त कळताच त्यांनी तातडीने खासगी विमानाची व्यवस्था केली आणि ते आडवानींना आणण्यासाठी हैद्राबादच्या विमानतळावर पोहोचले. नंतर आडवानी मुख्यमंत्र्यांच्या विमानातूनच बंगलोर कडे रवाना झाले असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिलच्या आठ तारखेलाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग तसेच नेत्या सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांना नेणारे जेट एअरवेजचे खासगी विमानही असेच तंत्रिक दोषामुळे दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले होते.