पुणे दि.२६ – शाळेतून मुलींची गळती रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरात येताना निवासाची सोय व्हावी यासाठी राज्य शासनाने केवळ मुलींसाठी ९ हॉस्टेल्स बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अंदाजे साठ कोटी रूपये खर्च केला जाणार आहे. या ९ मधील चार हॉस्टेल्स पूर्णपणे नवीन असतील तर बाकी पाच हॉस्टेल्सचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये २२५० मुलींची निवासाची सोय होऊ शकणार आहे. यातील एक हॉस्टेल पुण्यात होत असून पुण्याच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेत बांधले जाणार आहे आणि तेथे पाचशे मुलींची व्यवस्था केली जाणार आहे.
राज्य सरकार बांधणार मुलींसाठी हॉस्टेल्स
शिक्षण विभागाचे वरीष्ठ सचिव एन.बी. मराळे यासंदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की ग्रामीण भागातील पालकांच्या मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण मोठे आहे कारण उच्चशिक्षणासाठी या मुलींना शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने पालक पाठवत नाहीत. त्यामुळे सरकारने अशा मुलींचे शिक्षण अर्धवट सुटू नये यासाठी हॉस्टेल उभारणीचा निर्णय घेतला आहे. सरकारी संस्थांमध्ये शिकणार्याय मुलींनाच येथे प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
ही हॉस्टेल्स बांधून पूर्ण झाल्यावर त्यांच्या व्यवस्थापनासाठी १७१ कर्मचारी वर्ग नियुत्त* केला जाणार आहे. त्यात कारकून, रेक्टर, प्यून, सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. पुण्यासोबतच औरंगाबाद, मुंबई, जळगांव, सोलापूर, नांदेड, गडचिरोली आणि जालना येथे हॉस्टेल्स बांधली जाणार आहेत. सध्या राज्य सरकारची राज्यात ३१ कॉलेजेस असून त्यासाठी ५२ हॉस्टेल्स आहेत.पैकी २७ हॉस्टेल्स मुलींसाठी आहेत असेही मराळे यांनी सांगितले.
