
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेता सचिन जोशीला अटक केली आहे. गुटखा किंग म्हणून ओळखले जाणारे जगदीश जोशी यांचा सचिन हा मुलगा आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याचे त्याच्यावर आरोप आहेत. तब्बल 100 कोटींचा गैरव्यवहार ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशी यांनी केला होता. त्याची या प्रकरणी 18 तास चौकशी करण्यात आली. परंतु या चौकशीत अपेक्षित माहिती समोर न आल्यामुळे ईडीने अखेर त्याला अटक केली आहे.
कोट्यावधींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली अभिनेता सचिन जोशीला अटक
सचिन हा एक प्रसिद्ध उद्योजक देखील आहे. गोव्यामधील विजय माल्ल्याचा किंगफिशर व्हिला खरेदी केल्यामुळे, तो व्यवसायिक म्हणून पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. याशिवाय त्याचे देशभरात अनेक रेस्तराँ आणि क्लब आहेत. सचिनला ईडीकडून 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावण्यात आले होते. पण सचिन जोशी समन्स बजावल्यानंतही ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आले. तेथे 18 तास त्याची चौकशी करण्यात आली. पण त्याच्याकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्यामुळे अखेर ईडीने त्याला अटक केली.
याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांध्ये सहभागी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी ओमकार ग्रुप एक आहे. याशिवाय मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी ओमकार ग्रुपचे प्रकल्प सुरु आहेत.
