‘चिट फंड’ घोटाळ्यात चिदंबरमच्या पत्नीचे नाव

कोलकाता-पश्चिम बंगालमधील चिट फंड घोटाळ्यात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची वकील पत्नी नलिनी यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे.मुख्य आरोपी आणि शारदा ग्रुपचा प्रमुख सुदिप्त सेन याने अटक होण्यापूर्वी काश्मीरमधील हॉटेलमधून सीबीआयला पत्र लिहिले. यात त्याने त्याला ब्लॅकमेल करणा-या आणि त्याच्याकडून पैशांचा लाभ उठवणा-या २२ जणांचा उल्लेख केला असून, त्यामध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची वकील पत्नी नलिनी यांचे नाव समाविष्ट असल्याचे समजते.

या यादीत प. बंगालमधील तृणमूलच्या आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचाही समावेश आहे. या पत्रात यात सेन म्हणतो, ‘राजकीय नेत्यांशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या नेत्यांचा कायम दबाव असायचा’. अशाचप्रकारे मला इच्छेविरुद्ध गुवाहाटीतील एका न्यूज चॅनेलमध्ये गुंतवणूक करावी लागल्याचेही त्याने पत्रात म्हटले आहे. यात नलिनी चिदंबरम यांनी मध्यस्थ म्हणून काम पाहिले. यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये फी पोटी अदा केल्याचेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान, नलिनी यांचा या प्रकरणाशी संबध आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी तृणमूलच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे. नलिनी चिदंबरम यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, नलिनी यांनी शारदा ग्रुपवर उत्तरेतील टीव्ही चॅनेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणला नाही तर, त्यांनी आपल्या अशिलाला शारदा ग्रुपकडून निधी घेण्यास विरोध केला होता, असे स्पष्ट केले आहे .