सोलापूर – वादळी वा-यासह सुरू झालेल्या पावसामुळे सोलापुर परिसरात चौघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकाचे हाल झाले. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र पावसामुळे दिलासा लाभला.
शहरात वादळी वा-यासह पावसास गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. जोरदार वादळामुळे सोलापुरातील तुळजापूर रोड परिसरात घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर , कामठी परिसरात अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृताची नावे समजू शकली नाहीत.
जोराच्या वादळामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. शहरात तासभराहून अधिक वेळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले होते. तर , वीज गेल्याने निम्म्याहून अधिक शहर अंधारात होते. जोराने सुटलेल्या वा-यामुळे नागरिकांची ताराबळ झाली .