लंडन दि.२२ – भारतीय वंशाचे पोलाद सम्राट आणि सतत आठ वर्षे संडे टाईम्सच्या श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानावर असलेले लक्ष्मी मित्तल आता सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. यंदाच्या वर्षात त्यांची प्रथम क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरण झाली असून प्रथम क्रमांकावर यंदा रशियन अब्जाधीश अलीटेव उस्मानोव्ह यांनी बढती मिळविली आहे. उस्मानोव्ह यांची संपत्ती १३.३ अब्ज पौंड इतकी असून मित्तल यांची संपत्ती गतवर्षीच्या १२.७ अब्ज पौंडावरून १० अब्ज पौंडावर आली आहे.
लॉर्ड स्वराज पॉल यांनी यंदा हाऊस ऑफ लॉर्डस मधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून अग्रक्रम मिळविला आहे. संडे टाइम्सच्या यादीनुसार श्री आणि गोपी हिंदुजा अध्यक्ष व सह अध्यक्ष- हिंदुजा ग्रुप यांचे स्थान तिसरे आहे. त्यांच्या संपत्तीत गतवर्षीच्या ८.६ अब्ज पौंड वरून वाढ होऊन ती १०.६ अब्ज पौंड इतकी झाली आहे.
विशेष म्हणजे १९८९ सालच्या यादीत ब्रिटनची राणी सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंदविली गेली होती. त्यावेळी तिची वारसा हक्काने आलेली संपत्ती आणि सर्व इस्टेट, रॉयल आर्ट कलेक्शन यांचे मूल्य ५.२ अब्ज पौंड होते. मात्र त्यानंतर राणीची वैयक्तीक संपत्तीच गृहीत धरण्याचा नियम झाल्यानंतर १९९३ नंतर राणी या यादीत कधीच टॉपवर आलेली नाही असेही समजते.