मुंबई, दि. 22 – निर्माते शकील नुरानी यांच्या ‘जान की बाझी’ चित्रपटाचे काम अर्धवट सोडल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त याच्याविरोधात अंधेरी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मी तुमचे काम करणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करुन घ्या अशा शब्दांत संजयने आपल्याला धमकावल्याचे नुरानी यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, आपल्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटचे वृत्त समजताच संजय दत्त त्वरित न्यायालयात हजर झाल्याने, न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला.
संजयने 2002 मध्ये नुरानी यांच्या चित्रपटाचे काम अर्धवट सोडले होते आणि त्यानंतर चित्रपटाचे चित्रिकरण करण्यास नकार दिला होता. त्यामुळे निर्मात्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे या प्रकरणी शकील नुरानी यांनी संजय दत्त विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर न्यायालयाने संजयला न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय दत्त किंवा त्याच्या वकिलाने न्यायालयाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आधीच मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाचे खेटे घालणार्या संजय दत्तला नुरानी यांचा चित्रपट अर्धवट सोडल्यामुळे जामीनासाठी अंधेरी न्यायालयासमोर आता हजर रहावे लागणार होते. त्यानुसार तो आज हजरही झाला.
संजूबाबाच्या कोलांट्या
मुंबई बॉम्बस्फोटात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ठोठावली आहे. त्याला शरण येण्यासाठी न्यायालयाने एक महिन्याचा अवधीही दिला होता. या कालावधीत आपली अपुरी कामे पूर्ण न झाल्याचे कारण देत त्याने आणखी एक महिन्याचा कालावधी वाढवून घेतला आहे. त्याची शिक्षा माफ व्हावी म्हणून अनेक दिग्गज प्रयत्नशील असताना त्याने पत्रकार परिषद घेवून, आपण पूर्ण शिक्षा भोगणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, लगेचच या भूमिकेपासून फारकत घेत त्याने, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला आव्हान देणारी फेरविचार याचिका कालच दाखल केली आहे. त्याच्या या कोलांटउड्यांनी सामान्य माणूस मात्र चक्रावला आहे.