जगभरातील १०० देशांना पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट पाठवणार कोरोना प्रतिबंधक लस


पुणे – कोव्हिशिल्ड व नोवाव्हॅक्सच्या पुरवठ्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि युनिसेफ यांच्यात मोठा करार झाला असून या करारानुसार सीरमकडून येत्या काळात ११० कोटी कोरोना लसीचे डोस जगातील १०० देशांना पुरवले जाणार आहेत. भारत देश या माध्यमातून कोरोना लसीच्या निर्मितीतील एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. याशिवाय कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारताशी अनेक देश संपर्क देखील साधत आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटसोबत ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनकाच्या संयुक्त विद्यमातून विकसित करण्यात आलेल्या कोव्हीशील्ड लसीचे उप्तादन करण्याचा करार झालेला आहे. तर सीरमचा अमेरिकास्थित नोवाव्हॅक्स इंक कंपनीशी नोवाव्हॅक्स या लसीच्या उप्तादनासाठी करार झालेला आहे. सीरमसोबत झालेल्या कराराची माहिती युनिसेफचे कार्यकारी अधिकारी हेनरीटा फोर यांनी जाहीर केली आहे.

पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशनसह इतर अनेक संघटनांशी मिळून एकूण १०० देशांसोबत ११० कोटी लसीच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे, असे हेनरीटा फोर यांनी सांगितले. ही लस ३ अमेरिकन डॉलरमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

सीरमसोबत काम करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे युनिसेफने म्हटले आहे. अल्प उत्पन्न गटापर्यंत कोरोना लस पोहोचविण्यासाठी याआधीच कोवाव्हॅक्स मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघ याचे नेतृत्व करत आहे. या मोहिमेअंतर्गत जगातील १४५ देशांमधील मजूर आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दरात कोरोना लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी कोरोना लस बनविणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे.