मनसे कार्यकर्त्यांनी अडवली चंद्रकांत खैरेंची गाडी


औरंगाबाद: आता मनसेने एकेकाळी मंत्र्यांच्या गाड्या अडवणाऱ्या शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या गाड्या अडवायला सुरुवात केली आहे. आज मनसेने औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारत त्यांच्या अंगावर पत्रके फेकून जोरदार घोषणाबाजीही केली. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच हा राडा केल्यामुळे मनसेचे बळ औरंगाबादेत वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मनसेने शिवसेनेला औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी काहीच निर्णय राज्य सरकारने न घेतल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने आज क्रांती चौकात चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरेंच्या अंगावर फेकली. तसेच शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.