गालाची तुलना महागात; मंत्रीपदावरुन हकालपट्टी

प्रतापगड- उत्तर प्रदेशचे खादी व ग्रामोद्योग मंत्री राजाराम पांडेय यांना मतदारसंघातले रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे चकचकीत करेन, असे वक्तव्य महागात पडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या असल्या बेताल वक्तव्यामुळे निंदा तर झालीच पण त्यांना खूर्चीही गमवावी लागली आहे.

राजाराम पांडेय यांना उत्तर प्रदेशातील बेला मतदारसंघातील ररस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ‘सध्या रस्त्यांचे फेशियल सुरू आहे. लवकरच रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे चमकतील,’ असे उत्तर त्यांनी दिले होते. तसंच त्यांनी सुल्तानपूरच्या ‘डीएम’चं कौतुक करताना अत्यंत अशोभनीय असं वक्तव्य केले होते . सुल्तानपूर येथे पांडेय यांनी तेथील जिल्हाधिकारी के. धनलक्ष्मी यांच्या सौदर्याचं वर्णन भर सभेत सुरू केलं. सुंदर आहे… त्यांचं बोलण गोडं आहे. असा त्यांचा भर सभेत तोल ढासळत गेला. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. पण पद टिकून राहिलं.

त्यामुळे ‘ड्रीमगर्ल’ची तुलना रस्त्यांशी केल्यानं आपले पद जाईल असं पांडेय यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हते. पण एका पाठोपाठ एक बेताल वक्तव्य केल्यानं त्यांच्या विरोधकांना आयतं कोलीतच मिळालं. अखेर राजाराम पांडेय त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

दरम्यान, काही दिवसापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्यांशी केली होती. त्यावेळीही अशीच टीका झाली होती.