दुबई पोलिसांकडे पाठलागासाठी तीन कोटींची कार

दुबई – रसातळाला गेलेली देशाची अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत आहे याचे अनेक प्रयत्न दुबईकडून केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून दुबई पोलिसांच्या ताफ्यात गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी तब्बल तीन कोटी रूपयांची इटालियन लॅम्बॉर्गिनी अॅव्हेंटेडॉर ही गाडी दाखल झाली आहे. दोन दारांची आणि दोन सिटर अशी ही कार कांही क्षणात २१७ किमीच्या वेगाने धावू शकते. ही गाडी दुबई पोलिसांच्या वाहन ताफ्यातील वाहनांप्रमाणेच हिरव्या आणि पांढर्‍या रंगाची असून ही स्पोर्टस कार आहे.

वाहन उत्पादक इटालियन कंपनीने ही लॅम्बॉर्गिनी म्हणजे पीस ऑफ आर्ट असल्याचे वर्णन केले आहे. गुन्हेगारांनी कितीही वेगवान गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी या गाडीपुढे त्यांच्या वाहनाचा वेग कमीच असेल असाही दावा कंपनीने केला आहे. दुबईचे पोलिस उपमहासंचालक खमीस मटेल अल मुझौना यांनी मात्र ही कार जेथे पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात असते त्या जागेवर मुद्दाम दाखविण्यासाठीही नेली जाणार असल्याचे सांगितले.

दुबई पोलिसांच्या ताफ्यात कांही अमेरिकन कंपन्यांची वाहनेही सामील करण्यात येत आहेत. दुबई पोलिसांचा सुधारित वाहन ताफा आणि राजाच्या नावाने बांधली जात असलेली सॅटेलाईट सिटी दुबईची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्याचे संकेत देत आहेत असेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment