नवी दिल्ली दि.८ – नवीन उत्पादने अल्पावधीत बाजारात आणण्यात सक्षम असलेल्या कोरियन वाहन उद्योग कंपनी ह्युंडाईने भारतीय बाजारपेठेसाठी तीन नवी मॉडेल्स आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन उत्पादने लगोलग बाजारात आणण्याची आपली ताकद या निमित्ताने ही कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना दाखवून देण्याच्या प्रयत्नात आहे असे जाणकारांचे मत आहे.
महिंद्राच्या रेनॉल्ड डस्टरला भारतीय ग्राहकांची मिळालेली पसंती लक्षात घेऊन ह्युंडाईने एसयूव्ही मॉडेल बाजारात आणण्याचे ठरविले आहे. हुयंडाई इंडियाने अजून कॉम्पॅक्ट एसयूव्हीबाबत कांही संकेत दिलेले नसले तरी कोरियन कंपनी वेळ न दवडता कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्पर्धात्मक किमतीत भारतीय बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. ही गाडी डस्टर बरोबरच फोर्डच्या आगामी इकोस्पोर्टलाही टक्कर देईल असे समजते. आय टेनच्या प्लॅटफॉर्मवरच नवे मॉडेल येत असल्याने कंपनीचा विकास खर्च आटोक्यात राहणार आहे
मारूतीच्या मिनी एमपीव्ही एर्टिगाला आव्हान देण्यासाठी ह्युंडाई सज्ज झाली असून हे नवे मॉडेल शेव्हरोलेच्या एन्जॉयपुढेही आव्हान उभे करेल असा विश्वास कंपनी अधिकारी व्यक्त करत आहेत. हुंडाईने सॅट्रो पासून ते सुपर प्रिमियम आय २० पर्यंत अनेक छोटी मॉडेल्स आणली असून नवे मॉडेल आय १० आणि आय २० च्या मधले आहे असे समजते. याचे नामकरण सध्या आय १५ असे केले गेले आहे.
या तीन मॉडेल शिवाय डिझेल्स मॉडेल्सवरही कंपनीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. बाजारात आणखी कांही डिझेल मॉडेल्स आणली जाणार आहेत त्यासाठी कंपनीने ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नवीन डिझेल गॅसोलिन प्रकल्पात केली आहे. भविष्यात या प्रकल्पात तीन लाख गाड्यांचे उत्पादन होऊ शकणार आहे इतकी या प्रकल्पाची क्षमता आहे. ह्युंडाईने मारूती सुझुकी हेच आपले मुख्य टार्गेट ठेवले असून त्यामुळे जपानी आणि कोरियन कंपनीतील हे युद्ध कसे रंगते हाच औत्सुक्याचा विषय बनला आहे.