वजनाने अतिशय हलके आणि अशा प्रकारचे पहिले-वहिले असलेले सौर विमान अमेरिकेच्या किनारपट्टीवरून उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. सोलर इम्पल्सफ नावाचे हे विमान एक मे रोजी त्याचे ऐतिहासिक उड्डाण करणार असल्याची घोषणा या विमानाच्या निर्मात्यांनी केली आहे. सौर पॅनल आणि त्याला जोडलेल्या बॅटरीच्या ऊर्जेवर चालणारे हे विमान पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमान असेल.
बट्रंड पिकार्ड आणि आंद्रे बोर्शबर्ग या दोन स्विस वैमानिकांनी 10 वर्षाच्या प्रयत्नांतून हे विमान तयार केले आहे. मफिट फिल्ड ते न्यूयॉर्क दरम्यान या विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान केवळ एका वैमानिकाला घेऊन उड्डाण करू शकते. आज जरी सौर विमानात 200 प्रवासी बसवण्याची आपण कल्पना करू शकत नसलो तरी 1903 मध्ये जगातील पहिल्या विमान उड्डाणाच्या वेळी हीच परिस्थिती होती. या विमानामध्ये अभियांत्रिकीचा व भौतिकशास्त्राचा एक नवा आविष्कार घडवला आहे. सूर्यास्तानंतरही हे विमान सूर्याची ऊर्जा मिळवू शकते. यापूर्वी 2010 मध्ये या विमानाने 26 तासांचे उड्डाण केले आहे आणि गेल्या वर्षी हे विमान कोणत्याही इंधनाशिवाय स्वित्झर्लंडलडहून मोरोक्कोला गेले होते.