हिलरी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार -बिल क्लिंटन यांचे संकेत

वॉशिंग्टन दि. ८ – अमेरिकेत २०१६ सालात होणार्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन या भावी उमेदवार असू शकतात असे अप्रत्यक्ष संकेत त्यांचे पती व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी दिले आहेत. अमेरिकेतील लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे बिल एका सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना बिल म्हणाले की २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशवासियांना चांगला चॉईस उपलब्ध होऊ शकेल असे वाटते. बिल यांचा रोख हिलरी यांच्याकडे आहे हे लक्षात येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून बिल यांच्या विधानाचे स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना बिल म्हणाले की राष्ट्राध्यक्षपदासाठी दोन टर्म मिळण्यास आपली पसंती आहे. मात्र भविष्यात दोन वेळा राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही तिसर्यां दा चान्स मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्याला मात्र आपला विरोध आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनेक लायक आणि हुषार इच्छुक आहेत असेही ते म्हणाले.

सेक्रेटरी ऑफ स्टेट पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर हिलरी यांनी प्रथमच दोन सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थिती लावली असून राष्ट्राध्यक्षपद उमेदवारीबाबत त्यांनी नकार अथवा होकार अशी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी आत्तापासून त्यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिडसे ग्रॅनम म्हणाले की ओबामांची दुसरी टर्म किती यशस्वी होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. आठ वर्षाच्या काळात अमेरिकेतील प्रशासकीय परिस्थितीत फारसे बदल घडले नाहीत तर डेमोक्रॅटिक पक्षाला पुढची निवडणूक अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment