ओडिशा- भारतीय लष्करातर्फे रविवारी सकाळी ओडिशा येथे भारतीय बनावटीच्या अण्वस्त्र वाहक अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी-२ हे अण्वस्त्र वाहक असलेले हे क्षेपणास्त्र २००० किमीपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्यभेद सहजपणे करू शकते अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.
अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी झेप
लष्कराच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी-२ हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ओडिशाजवळील व्हीलर बेटावर रविवारी सकाळी १०:२० मिनिटानी चाचणी घेण्यात आली. मोबाइल लाँचरच्या सहाय्याने घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी झाली असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.
भारतीय लष्करात अग्नी-२ या क्षेपणास्त्राचा आधीपासूनच समावेश करण्यात आला आहे. रविवारी घेण्यात आलेली चाचणी हा डीआरडीओच्या नेहमीच्या अभ्यासाचाच भाग होता, असेही सूत्रांनी सांगितले. अग्नी-२ हे २० मीटर उंचीचे दोन स्टेज असलेले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे वजन १७ टन इतके असून १००० किग्रॅ. वजनाचे अस्त्र २००० किमीपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्यापर्यंत हे वाहून नेऊ शकते.
