पाकिस्तान ज्येष्ठ नागरिकांना भारतात ऑन अरायव्हल व्हिसा

नवी दिल्ली दि. ६ – शेजारी राष्ट्र पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारणेच्या प्रयत्नाचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानातील ज्येष्ठ नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हल देण्याची सुरवात १ एप्रिलपासून केली असल्याचे गृह मंत्रालयातील अधिकार्यांचनी सांगितले. अत्तारी इंटिग्रेटेड चेक पोस्टवर असा व्हिसा दिला जात आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध तणावरहित व्हावेत आणि त्यात सुधारणा व्हावी यासाठी अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. व्हिसा ऑन अरायव्हल हा त्याचाच एक भाग असून असे व्हिसा १५ जानेवारीपासूनच देण्यात येणार होते. मात्र काश्मीर सीमेवर गस्ती पथकातील दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करण्याचे कृत्य पाकिस्तानी सैनिकांनी केल्यामुळे हा कार्यक्रम थांबविण्यात आला होता कारण या हत्यांमुळे परस्परसंबंधात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ज्येष्ठ नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हल प्रमाणेच गट पर्यटक व्हिसा देण्याबाबतही दोन्ही देशांत बोलणी झाली होती मात्र गट पर्यटन व्हिसाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असे व्हिसा १५ मार्च पासून देण्यात येणार होते. या संबंधीचे करार गेल्या सप्टेंबरमध्येच केले गेले होते असेही या अधिकार्‍यांनी सांगितले.