मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम


मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपसोबतची युती तुटल्यामुळे खूप मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता असून शिवसेनेने याच पार्श्वभूमीवर आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने एक मोहीम सुरु केली आहे. शिवसेनेने गुजराती मतदारांना ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे म्हणत साद घातली आहे.

शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करत सत्ता काबीज केली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सरकार स्थापन करु न शकल्यामुळे भाजपने आता शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे. त्याचबरोबर सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचेही जाहीर केले आहे.

आता त्यादृष्टीने शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम शिवसेनेकडून सुरु करण्यात आली आहे. गुजरात्यांसाठी शिवसेनेकडून एक मेळावा आयोजित करण्यात आला असून अशी टॅगलाईन त्याला वापरण्यात आली आहे. गुजराती मतदारांची जबाबदारी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हा मेळावा १० जानेवारीला जोगेश्वरीत पार पडणार आहे. मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रणे यासाठी छापण्यात आली आहेत. या मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेशदेखील पार पडतील असे सांगितले जात आहे.