तीन राज्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग: हजारो पक्षी मृत्युमुखी


नवी दिल्ली: भारत आणि संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देण्याच्या प्रयत्नात असताना देशातील ३ राज्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे या राज्यांमध्ये हजारो पक्षी या संसर्गामुळे मरण पावले आहेत.

हिमाचल प्रदेशमधील पॉंग धरणाच्या तलावाच्या परिसरात सुमारे १ हजार ७०० स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने या परिसरातील पर्यटनाला स्थगिती दिली आहे. या पक्ष्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’च्या संसर्गाने झाल्याची शक्यता विचारात घेऊन त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोंबड्या, अंडी आणि कोंबड्यांचे मांस यांच्या खरेदी- विक्रीवर जिल्ह्याच्या काही भागात बंदी घालण्यात आली आहे.

पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही मनुष्य किंवा अन्य प्राण्यांना जलाशयात आणि सुमारे एक किलोमीटरच्या परिघात प्रवेश निषिद्ध करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार प्रजापती यांनी दिले आहेत. या परिसरातील जलाशयापासून सुमारे नऊ किलोमीटर क्षेत्रात काटेकोर लक्ष ठेवले जात आहे.

बर्ड फ्लू हा एच ५ एन १ इन्फ्लूएंझा विषाणूमुळे पक्ष्यांमध्ये होणारा एक अत्यंत संसर्गजन्य श्वसन रोग आहे. या रोगाचा संसर्ग माणसांमध्येही होऊ शकतो.

केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ८ जणांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांत सुमारे १२ हजार बदके मरण पावली आहेत. तर आणखी ३६ हजार पक्षी मृत्युमुखी पडण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.

राजस्थानमध्ये शेकडो कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. झालावाड जिल्ह्यात आणि जयपूरसह इतरही अनेक शहरांमध्ये मृत कावळ्यांमध्ये ब्रँड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.