
कोलकाता, दि. 3 -गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीवर सांघिक कामगिरीने चढविलेला कळस असेच कोलकाता नाईट रायडर्सच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवरील विजयाचे वर्णन करता येईल. गतविजेत्या कोलकाताने या विजयामुळे आयपीएलच्या सहाव्या मोसमाचा शानदार प्रारंभ केला.

कोलकाता, दि. 3 -गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीवर सांघिक कामगिरीने चढविलेला कळस असेच कोलकाता नाईट रायडर्सच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवरील विजयाचे वर्णन करता येईल. गतविजेत्या कोलकाताने या विजयामुळे आयपीएलच्या सहाव्या मोसमाचा शानदार प्रारंभ केला.
सुनील नारायण, रजत भाटिया आणि ब्रेट ली यांच्या भेदक मार्यासमोर दिल्लीचा डाव 20 षटकांअखेर 128 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर कोलकाताने 18.4 षटकांत 4 बाद 129 धावा करून दिल्लीची कडवी झुंज 6 गडी व 8 चेंडू राखून मोडून काढली .
मनविंदर बिस्ला दुसर्याच षटकात परतल्याने कोलकाताच्या डावाची सुरुवातही सनसनाटी झाली. परंतु गौतम गंभीर आणि जॅक कॅलिस (23) या अनुभवी फलंदाजांनी व्यावसायिकतेचे दर्शन घडविताना 47 धावांची भागीदारी करून डाव सावरला.
गंभीरने केवळ 29 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 42 धावांची खेळी करताना मनोज तिवारीसह (23) 41 धावांची भागीदारी करून कोलकाताची आगेकूच कायम राखली. परंतु हे दोघेही लागोपाठ परतल्याने कोलकाताची 2 बाद 93 वरून 4 बाद 99 अशी घसरगुंडी झाली.
अखेरीस 24 चेंडूंत 25 धावा अशा अटीतटीच्या स्थितीतून युसुफ पठाण आणि मॉर्गन या जोडीने 4.2 षटकांत 30 धावांची भागीदारी करीत कोलकाताचा विजय साकार केला.
तत्पूर्वी सेहवाग खेळणार नसल्याचे जाहीर झाल्यावरच या सामन्यात कोलकाताची बाजू वरचढ असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षातही तसेच घडले. अनुभवी ब्रेट लीने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर उन्मुक्त चंदचा त्रिफळा उडवून कोलकाताला सनसनाटी प्रारंभ करून दिला. त्या धक्क्यातून सावरणे त्यांना अखेरपर्यंत जमलेच नाही.
जयवर्धने आणि वॉर्नर या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. या जोडीने दुसर्या गड्यासाठी केलेली 44 धावांची भागीदारी दिल्लीच्या डावातील सर्वोच्च ठरली. सामन्यातील दुसर्याच चेंडूवर मैदानात उतरलेल्या जयवर्धनेने 19 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद होईपर्यंत 52 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 66 धावा केल्या. वॉर्नरने 19 चेंडूंत 4 चौकारांसह 21 धावा करीत त्याला साथ दिली. सुनील नारायणने केवळ 13 धावांत 4 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली, रजतने 23 धावांत 2, तर ब्रेट लीने 40 धावांत 2 बळी घेतले.