नाशिक – गेल्या काही दिवसापासून राज्याच्या दौरा करीत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. त्याच्या राज्यव्यापी दौ-यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील सभेने त्यांच्या या दौ-याची सांगता होणार आहे. या ठिकाणच्या सभेत राज ठाकरे पुन्हा खडसेना टार्गेट करणार असे दिसत आहे.
खानदेशातील तिन्ही जिल्हे आता त्यांच्या निशाण्यावर आहेत. विशेषतः भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभा ठेवल्याने एकनाथ खडसेंवर राज पुन्हा निशाणा साधणार का? यावर चर्चा सुरु झालीय.नाशिक महापालिकेच्या सत्तेत येऊन मनसेला वर्ष पूर्ण झाले आहे. शहरातील तीन आमदार निवडून आल्याने मनसेला नाशकात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाकरेंनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
राज यांच्या या नाशिक दौ-यात पदाधिका-यांच्या चर्चा आणि शहर विकासावर भर असणार आहे.
गेल्या काही काळात नाशिककरांनी चार आमदार तीन पलिका ताब्यात देऊन मनसे विकासाला पाठबळ दिले आहे. आता राज्यात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले राज ठाकरे नाशिककरांच्या विकासाला सुरुवात करतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.