नवी दिल्ली दि.२ ८ – डिझेलच्या दरात सतत होत असलेली वाढ आणि थर्ड पार्टी विम्याचे वाढलेले दर मागे घ्यावेत या मागणीसाठी देशभरातील वाहतूकदारांनी १ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून त्यात देशातील ७५ लाख ट्रकचालक आणि ४० लाख खासगी वाहतूक वाहने सामील होणार असल्याचे वाहतूकदार संघटनेने जाहीर केले आहे.
देशभरातील वाहतूकदारांचा १ एप्रिलपासून बेमुदत संप
या विषयी अधिक माहिती देताना वाहतूकदार संघटनेचे सदस्य म्हणाले की गेल्या काही काळात आम्ही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी याविषयी सतत बोलणी करत आहोत पण त्यातून कांहीही तोडगा निघालेला नाही. आता थर्ड पार्टी विमादरही वाढविले गेले आहेत. डिझेलची दरवाढ सुरूच आहे. डिझेल मर्यादित स्वरूपात नियंत्रण मुक्त करावे, थर्ड पार्टी विमा दरवाढ रद्द करावी तसेच आयात टायर्सवरील अँटी डंपिग ड्यूटी मागे घ्यावी , माल वाहतूक किमान दर निश्चिती करावी अशा आमच्या कांही मागण्या आहेत.
या मागण्या मान्य करण्यासाठी ३० मार्चपर्यंत सरकारला मुदत दिली आहे मात्र या काळात त्या मान्य झाल्या नाहीत तर देशभरातील वाहतूकदार संपात सामील होणार आहेत. यामुळे दररोज २२०० कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे असेही या सदस्यांनी सांगितले.
