
पुणे , दि. 019 (प्रतिनिधी) – पुणे विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल 2013 मध्ये घेतल्या जाणार्या परीक्षांची प्राथमिक तयारी विद्यापीठ प्रशासनााने पूर्ण केली आहे. मात्र, येत्या 25 मार्च पर्यंत प्राध्यापकांनी परीक्षेवरील बहिष्कार मागे घेतला तरच विद्यापीठाच्या परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, अशी माहिती विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एम.पुक्टो या प्राध्यापक संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी परीक्षेच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे औरंगाबाद व नांदेड विद्यापीठ वगळता सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. पुणे विद्यापीठासह बहुतांश सर्व विद्यापीठांनी प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी लागणारी सर्व तयारी केली, तरी प्राध्यापकांच्या सहकार्याशिवाय विद्यापीठाला परीक्षा घेता येणार नाहीत. प्राध्यापकांनी येत्या 25 मार्च पर्यंत आंदोलन मागे घेतले तरच विद्यापीठाला कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षा घेणे श्नय होईल.
परीक्षा विभागातील अंतर्गत कारणांमुळे परीक्षा नियोजनाचे काम रखडले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये परीक्षेची स्टेश्नरी पाठविणे, वेळापत्रक जाहीर करणे ही कामे करण्यात आली. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्याही चूकी शिवाय जाहीर करण्यात आला आहे. द्वितीय वर्षाचा निकाल आज (दि.19) रात्री उशीरा पर्यंत जाहीर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे
